छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : शहरात तीन लाख ७० हजारच मालमत्ता असल्याचा दावा करणार्या महापालिकेचा अक्षम्य हलगर्जीपणा आता उघडकीस आला. कचरा संकलनाचे कंत्राट मिळालेल्या गुजरातच्या वेस्टर्न इमॅजनरी या खासगी कंपनीने अवघ्या दोन महिन्यांत केलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल पाच लाख मालमत्ता असल्याचे वास्तव समोर आणले. म्हणजेच १ लाख ३० हजार मालमत्ता वर्षानुवर्षे महापालिकेच्या नजरेआड गडप होत्या! महापालिकेला जे दशकानुदशके जमले नाही, ते एका खासगी कंपनीने इतक्या कमी कालावधीत कसे काय केले? हे निव्वळ प्रशासकीय अपयश आहे की, करचोरीकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, असा थेट सवाल आता उपस्थित झाला आहे.
शहराचा विस्तार वेगाने होत असताना मालमत्तांची नोंद अद्ययावत ठेवणे, ही महापालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात दरवर्षी केवळ आठ ते दहा हजार मालमत्तांचीच भर पडते. कंपनीने कचरा संकलनासाठी किती कर्मचारी, किती घंटागाड्या लागतील, याचा अंदाज घेण्यासाठी सर्वेक्षण केले. यात एका फटक्यात १ लाख ३० हजार मालमत्ता वाढल्याचे कंपनीने समोर आणले. यामुळे महापालिकेच्या नोंद प्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.












